मुंबईः मार्केटींग कंपनीची ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध मुंबईत पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. एचडीआयएल आणि तक्रारदार कंपनीने संयुक्तपणे अंधेरी येथे उद्योग केंद्र विकसित केले होते. परंतु वाधवान यांनी भागीदार कंपनीला अंधारात ठेवून या प्रकल्पातील काही कार्यालये विकली आणि दोघांमधील परस्पर सामंजस्य कराराचाही भंग केला, असा आरोप आहे. फेब्रवारी २०१४ ते जुलै २०१८ या कालावधीत फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. यापूर्वी पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील सहा हजार ६७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी वाधवान यांना २०१९ मध्ये अटक झाली होती.
लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात मंगळवारी राकेश वाधवन, सारंग वाधवन, व्यंकटवर्धन अय्यंगर, वरयम सिंह अरोरा आणि इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४०९ ( विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग) , ४२० (फसवणूक), ४२३ (कराराची अप्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे), १२० (ब) (गुन्हेगारी कट) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत शाह (४५) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मॅक स्टार ही मॉरिशस येथील ओशन डेइटी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स लि.(ओडीआयएल) व वाधवान यांच्या मालकीच्या एका कंपनीची सामायिक भागिदारीतील कंपनी आहे. मॅक स्टारने २००८ मध्ये अंधेरी पूर्व येथे ‘कॅलेडोनिया, बिझनेस पार्क’ ही इमारत विकसित केली होती. मॅकस्टार कंपनीत ओडीआयएलची ९५ टक्के गुंतणूक असल्यामुळे त्यांना आर्टिकल असोसिएशन अंतर्गत करारामध्ये विशेष अधिकार देण्यात आले होते. त्याअंतर्गत मॅक स्टारचे संचालक-भागधारकांना मालमत्ता विकण्यास, गहाण ठेवण्यास किंवा २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्यास ओडीआयएलची संमती आवश्यकता असल्याची तरतूद होती.
असे असतानाही वाधवान यांनी मॅक स्टारमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून एचडीआयएलचे संचालक व्यंकटवर्धन अय्यंगर, वरयम सिंह अरोरा यांच्यामार्फत कॅलेडोनियाच्या आठ कार्यालयांची विक्री केली. त्याबाबत ओडीआयएल या कंपनीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांचे ८८ कोटी ४७ लाख रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कॅलेडोनियामधील ही कार्यालये खरेदी करणाऱ्या व्यक्तींविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.