मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली काळाचौकी पोलिसांनी रविवारी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्काराचेही कलम लावण्यात आले आहे. तसेच पाच अल्पवयीन आरोपींची डोंगरी बालसुधागृहात रवानगी करण्यात आली असून २७ वर्षीय आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीच्या घरी प्रथम पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी तिचे चित्रीकरणही केल्याचा आरोप मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे.

पीडित मुलगी १४ वर्षे नऊ महिन्यांची आहे. तक्रारीनुसार, गेल्यावर्षी १ ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम १७ वर्षीय आरोपीने पीडित मुलीसोबत जवळीक साधली. त्याने तिला अटक करण्यात आलेल्या २७ वर्षीय आरोपीच्या घरी नेले. तेथे आरोपींंनी तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्या चित्रीकरणाद्वारे आरोपींनी पीडित मुलीला अश्लील चित्रीकरण पाठवण्यास सांगितले. त्या चित्रीकरणाच्या आधारे इतर चार अल्पवयीन आरोपींनीही पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अल्पवयीन आरोपी १६ ते १७ वयोगटांतील आहेत. त्यातील एक आरोपी २७ वर्षांचा असून त्याला याप्रकरणी अटक केली आहे.

अल्पवयीन आरोपीच्या प्रेयसीमुळे प्रकार उघड

अल्पवयीन आरोपीसोबत पीडित मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा त्याच्या प्रेयसीला संशय आला. त्यावेळी तिने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यावेळी तपासणीत पीडित मुलीचे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यावेळी तिने मुलीला विचारले असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली. याप्रकरणात पोलिसांनी मोबाइलही जप्त केले असून न्यायवैधक तज्ज्ञांच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. आरोपी व पीडित मुलगी परिचीत आहेत.