मुंबई : कलिना येथील जुन्या विमातळावर छताचे काम सरू असताना खाली पडून २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला दोन महिने झाल्यानंतर अखेरीस विमानतळ पोलिसांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी व्हीबी इंजिनीयरिंग सिस्टिमचे मालक सनथ कुमार, व्यवस्थापक वासुदेव गोपाळकृष्ण पळन, तसेच एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेसचे व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी प्रतीक पेनुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, १ एप्रिल रोजी २८ वर्षीय कामगार विशाल माढेशिया काम करत असताना खाली पडला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासात उघड झाले की आरोपींनी माढेशियाला प्रशिक्षित नसतानाही ते काम दिले होते. तसेच, कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक असलेली जाळी लावण्यात आली नव्हती. कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे दिली नव्हती आणि घटनास्थळी कोणताही सुरक्षा अधिकारी उपस्थित नव्हता. या निष्काळजीपणामुळे माढेशियाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.