मुंबई– शाकाहारी माणसं आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ असतात. मांसाहारी पदार्थ त्यांना जराही चालत नाही. चुकूनही जर त्यांच्या ताटात मांसाहारी पदार्थ आला तर मात्र समोरच्याची खैर नसते. असाच प्रकार अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणाच्या बाबतीत घडला. त्याला एका प्रसिध्द पिझ्झा दुकानाने चुकून मांसाहारी पदार्थ पाठवला. संतापलेल्या त्या तरूणाने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत दोन कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी आकाश यादव (२३) हा तरुण अंधेरी पूर्वेच्या सहार येथे राहतो. तो डेटा सायन्सचा विद्यार्थी आहे. आकाश हा पूर्णपणे शाकाहारी आहे. २६ ऑगस्ट रोजी त्याने अंधेरी पूर्वेच्या एका एका प्रसिध्द पिझ्झा दुकानातून शाकाहारी (व्हेज) पनीर टाको आणि व्हेज मेयोनीज असे दोन पदार्थ ऑनलाइन ऑर्डर केले होते.
..नॉनव्हेज निघाल्याने संतापला
सकाळी सुमारे ९:३० वाजता त्याने ऑर्डर केलेला पिझ्झा आला. आकाशने पार्सल उघडले असता त्याला काहीतरी वेगळे असल्याची शंका आली. तरी खात्री करण्यासाठी त्याने एक घास घेतल्यावर वेगळी चव लागली. त्याने तो पिझ्जा इतरांना चाखायला दिला. तेव्हा ते व्हेज पनीर नसून चिकन असल्याचे आढळले. पूर्णपणे शाकाहारी असलेला आकाश या प्रकारामुळे प्रचंड संतापला. त्याने लगेचच अंधेरी पूर्वेतील त्या पिझ्झा दुकानात जाऊन पार्सल परत केले आणि व्यवस्थापकाला विचारणा केली. व्यवस्थापकाने अभिषेक रांखांबेने हे खाद्यपदार्थ तयार केल्याचे सांगितले. असा प्रकार पुन्हा होणार नाही असे सांगून दिलगिरी व्यक्त केली आणि आकाशचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र आकाश त्यासाठी तयार नव्हता.
अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी आकाश यादवने अंधेरी पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिझ्झा दुकानाचा कर्मचारी रणखांबे आणि व्यवस्थापक शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ अंतर्गत (धार्मिक भावना दुखावण्यासाठी मुद्दाम व द्वेषाने केलेली कृत्ये) गुन्हा नोंदवला.
मांसाहारामुळे भावनेशी निगडीत
भारतात अनेक लोक धार्मिक कारणांमुळे मांसाहार करत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला चुकून मांसाहारी पदार्थ खायला दिले, तर त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. काही ठिकाणी त्यातून वादही निर्माण होतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारचे मांस किंवा मांसामधील घटकांमुळे ऍलर्जी असते. अशा वेळी चुकून मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास त्यांना त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा पोटाचे विकार अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये, ऑर्डर देताना किंवा जेवण वाढताना झालेल्या चुकांमुळे शाकाहारी पदार्थांच्या ऐवजी मांसाहारी पदार्थ येतात. त्यामुळे ग्राहकांच्या भावना दुखावतात. यापूर्वी देखील काही प्रकरणात रेस्टॉरंटला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे.