मुंबई : इमारतीच्या उद्वाहनात जाणारी १६ वर्षीय मुलगी एकटीच असल्याचे पाहून तिला १मला दूरध्वनी कर´ अशी चिठ्ठी देणाऱ्या ५३ वर्षीय सुरक्षा रक्षकाला विलेपार्ले पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपी पीडित मुलीचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलगी राहत असलेल्या निवासी सोसाटतून पायी जात होती. त्यावेळी ती एकटी जात असल्याचे पाहून आरोपी सुरक्षा रक्षकाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर ती उद्वाहनात जाण्यासाठी उभी असताना तिच्या जवळ आला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला एक चिठ्ठी दिली.

मला दूरध्वनी कर, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे आरोपीने पीडित मुलीला सांगितले. या प्रकारामुळे मुलगी घाबरली होती. तिने चिठ्ठी उघडली असता त्याच आरोपीने आपला मोबाईल क्रमांक व नाव लिहिले होते. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिने कुटुंबियांच्या मदतीने याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर एक पथक गुन्हा घडलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. तेथून शुक्रवारी मध्यरात्री आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. विलेपार्ले पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचीत व्यक्त आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते.