मुंबई : जयपूर-मुंबई विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानाने सोमवारी सायंकाळी सात वाजता जयपूरहून उड्डाण केल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी कर्मचाऱ्यांना शौचालयात चिठ्ठी सापडली. रात्री ९च्या सुमारास विमान मुंबईत सुरक्षितरित्या उतरविल्यानंतर तपासणी केली असता, कोणतीही धोकादायक वस्तू सापडली नाही. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत १२५ (निष्काळजीपणामुळे जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य), ३५१(४)(ओळख लपवून धमकी देणे), ३५३(१)(ब) (जनतेमध्ये घबराट निर्माण करणारी विधाने करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.