नरिमन पॉइंट येथील एका खासगी कंपनीच्या बँक खात्यातून वेतनापोटी अधिक रक्कम काढल्याप्रकरणी कंपनीतील महिला व्यवस्थापकाविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महिलेने कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नावाच्या विविध याद्यांमध्ये स्वत:चे नाव समाविष्ट करून आपल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली. कंपनीच्या संचालकाने तिच्यावर विश्वास ठेवून तिचा क्रमांक बँक खात्यासाठी नोंदवला होता.

याप्रकरणी आतापर्यंत ४८ लाख ६६ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. नरिमन पॉइंट येथील एका कमोडिटी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या वैशाली विपुल कोटक हिच्याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. कंपनी गोदाम आणि तेथे ठेवलेल्या वस्तूंची देखरेख करण्याचे काम ती करीत होती.

कंपनीची ५०० ठिकाणी ७०० गोदाम आहेत आणि जवळपास एक हजार कर्मचारी या ठिकाणी काम करतात. त्यांचा विस्तार आणि पगाराची प्रक्रिया कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून करण्यात येते. आरोपी महिला ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीत रुजू झाली होती. कर्मचाऱ्यांच्या पगाराची प्रक्रिया करणे आणि कंपनीचे नेट-बँकिंग व्यवहार हाताळणे यासह कंपनीची सर्व आर्थिक कामे ती पाहत होती.
तक्रारदार कंपनीने सर्व कर्मचारी तीन श्रेणींमध्ये विभागले असून कोटक दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तीन वेगवेगळ्या एक्सेल शीट कंपनीच्या संचालक विद्या शेखसारिया यांना सादर करायची. त्यानंतर तीन धनादेशांवर त्यांची स्वाक्षरी घ्यायची.

हेही वाचा : मुंबईतील दयनीय रस्त्यांचा अहवाल स्वत: महापालिका आयुक्तांनी द्यावा; उच्च न्यायालयाचा आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च २०२२ मध्ये लेखा विभागातील कर्मचारी आणि कोटकचा सहाय्यक यांना एका बिलात विसंगती आढळून आली. त्यांनी याबाबत कोटक यांना न सांगता थेट कंपनीच्या संचालकांना माहिती दिली. नंतर गेल्या दोन वर्षांच्या हिशोबांची छाननी करण्यात आली. त्यावेळी कोटकने विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या यादीत स्वतःचे नाव नमुद करून काही महिन्यांमध्ये एकाहून अधिक वेळा पगार घेतल्याचे निष्पन्न झाले.कंपनीच्या संचालकांनी एप्रिलमध्ये कोटकला याबाबत विचारले असता तिने पैसे घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर तक्रारदार कंपनीने लेखापालाची नेमणूक करून लेखापरीक्षण करून घेतले. कोटक यांनी कंपनीकडून ४८ लाख ६६ हजार ५२७ रुपये घेतल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले. त्यानुसार याप्रकरणी मंगळवारी भादंवि कलम ४०८ अंतर्गत कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.