करोनामुळे प्रवासीसंख्या, अन्य व्यवहार कमी झाल्याचा फटका

मुंबई : रेल्वेवरील तिकीट, पास काढताना केल्या जाणाऱ्या ‘रोकडविरहित’ व्यवहाराला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र करोनाकाळात त्याला उतरती कळा लागली आहे. प्रवाशांच्या संख्येत झालेली घट आणि तुलनेने अन्य व्यवहारांवर झालेला परिणाम ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. पश्चिम रेल्वेवर २०२०-२१ मध्ये ३७ हजार १०, तर मध्य रेल्वेवर अवघ्या ७८ मासिक पास, तिकिटांची रोकडविरहित व्यवहारांच्या माध्यमातून विक्री झाली.

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने ‘रोकडविरहित’ व्यवहाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रेल्वेने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पीओएस यंत्र (पॉइंट ऑन सेल) बसवण्याचा निर्णय घेतला. पीओएस यंत्रावरून प्रवासी डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट, मासिक पास घेऊ लागले. पश्चिम रेल्वे मुंबई विभागातील चर्चगेट स्थानकात पहिले पीओएस यंत्र बसविण्यात आले. आता लोकल तिकीट खिडकी, मेल-एक्स्प्रेस तिकीट खिडकी, पार्सल आणि मालवाहतूक खिडक्यांवर एकूण एक हजार २२३ पीओएस यंत्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उपनगरीय स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ३१२ यंत्रे आहेत, तर मध्य रेल्वे स्थानकांतही ४०९ पीओएस यंत्रे आहेत.

पश्चिम रेल्वेवर २०१९-२० मध्ये पीओएस यंत्रामध्ये डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करून चार लाख ४६ हजार ८७९ मासिक पास आणि चार हजार ८९८ तिकीट काढण्यात आले होते. २०२०-२१ मध्ये हीच संख्या कमी होऊन २३ हजार २४३ मासिक पास आणि ५९८ तिकीट विक्री झाली होती. त्यात २०२१-२२ मध्ये आणखी कमी होऊन १२ हजार ९८५ पास आणि १८४ तिकिटांची विक्री झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये दोन हजार ४७१ मासिक पास आणि तिकीट, तर २०२०-२१ मध्ये ७८ मासिक पास आणि तिकीट देण्यात आले आहेत. हा आलेख आणखी खाली आला आहे.

महसुलात घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीओएस यंत्र सेवेतून २०१९-२० मध्ये ३७ कोटी ७५ लाख रुपये, २०२०-२१ मध्ये एक कोटी ९७ लाख रुपये आणि २०२१-२२ मध्ये एक कोटी १४ लाख रुपये महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला. तिकीट खिडक्यांवर पीओएस यंत्र ठेवतानाच तिकीट तपासनीसांनाही विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करताना दंडवसुलीसाठी पीओएस यंत्र देण्यात आली आहेत.