मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लोअर परळ येथील पारपत्र सेवा केंद्र येथील कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांवर आधारित पारपत्र काढून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक पारपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा आरोप आहे. तसेच सात बनावट पारपत्र अर्ज सीबीआयला सापडले आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे.

कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोअर परळ येथील पारपत्र सहाय्यक केंद्रावर पडताळणी अधिकारी म्हणून काम करत होते. सीबीआयने या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, २०२३-२०२४ या काळात संबंधित मीणा व खासगी दलाल शहा यांनी संगनमत करून कट रचला होता. दोघेही पारपत्र मिळवून देण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोप आहे.याप्रकरणी सीबीआयने अधिक तपास केला.त्यावेळी महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली.

सीबीआयच्या तपासानुसार, आरोपी अक्षय मीणा व दलाल शहा बनावट कागदपत्रांच्या साह्याने पारपत्र मिळवून देत होते. अशी काही अज्ञात अर्जदारांची माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे. या अर्जदारांनी पारपत्राच्या अर्जासह आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील व जन्म दाखला यांसारखी बनावट कागदपत्रे सादर केली होती. तपासादरम्यान, या सर्व कागदपत्रांची सत्यता पडताळणी करण्यात आली. त्यात ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी मीणा व शहा यांच्यातील मोबाईल चॅट्समध्ये बनावट पारपत्र अर्जदारांसंबंधित पैशांच्या व्यवहारांवर चर्चा झाल्याचे उघड झाले आहे. या अर्जदारांनी त्यांच्या अर्जांमध्ये दिलेले मोबाईल क्रमांकही बंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, तत्काळ योजनेअंतर्गत दिलेले पारपत्र मिळविल्यानंतर झालेले पोलीस पडताळणी अहवालही प्रतिकूल आढळले आहेत.त्याबाबत सीबीआयने तपासणी केली असता अर्जदारांनी दिलेले रहिवासी पुराव्यावरील पत्तेही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही आरोपी तपासादरम्यान सहकार्य करत नव्हते व त्यांच्या तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सीबीआयने दोघांना अटक केली. त्यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले असून ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत राहतील. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे.