लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र त्यात गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नीट परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. हा फरक लाखात आहे. तसेच ६७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवणे हे एनटीएच्या गुण पद्धतीमध्ये अशक्य आहे. एनटीएच्या परीक्षेत प्रत्येक प्रश्नामध्ये उणे ४ गुण असतात. ज्यामुळे चुकीच्या उत्तरासाठी एकूण ५ गुणांचे नुकसान होते. पण या वर्षी विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ गुण मिळाले आहेत, यावरून चाचणी आणि मूल्यमापन संशयास्पद असल्याचे सिद्ध होते. विद्यार्थ्यांना फसवणूक किंवा पेपर फुटणे यासारख्या कोणत्याही फसव्या कृतीत सहभागी होण्यापासून परावृत्त केले. असे आचरण समाजात नकारात्मकता निर्माण करते आणि त्याचा संपूर्ण समाजावर घातक परिणाम होतो. त्यामुळे नीट परीक्षेच्या आकडेवारीतील विसंगतींबद्दल सीबाआय चौकशीची मागणी करत विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती नॅशनल टेस्टिंग एजन्सीसह पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. बसवराज यांनी दिली.

आणखी वाचा-पावसाळ्यात रेल्वेचा घाटातील प्रवास सुरक्षित, दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचे आवरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीट २०२४ ही वैद्यकीय परीक्षा सुमारे ५७१ शहरांमध्ये १३ भाषांमध्ये घेण्यात आली. २ लाख १० हजार १०५ निरीक्षकांच्या देखरेखीखाली ४ हजार ७५० केंद्रांवर ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी सुमारे २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सुमारे १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर चौघांना ७२० पैकी ७१५ गुण मिळाले. देशभरातील फक्त दोन विद्यार्थ्यांना २०२३ मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. मात्र २०२२ मध्ये एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीत.