आयएनएचएस हे नौदलाचे रुग्णालय आणि कांदिवली येथील लष्कराचे औषध भांडार (एएफएमएसडी) या दोन्ही ठिकाणी शुक्रवारी सकाळीच सीबीआयचे पथक धडकले आणि त्यांनी औषध खरेदीच्या संदर्भातील कागदपत्रांची कसून छाननी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती, असे समजते.
सैन्यदलांसाठी औषध खरेदी आणि साठवणुकीसाठी एक धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र या धोरणास बगल देऊन या दोन्ही ठिकाणी औषध खरेदी झाल्याचा संशय आहे. नौदल आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कारवाईची कल्पना देण्यात आली होती, अशी माहिती सीबीआयमधील सूत्रांनी दिली. या औषध खरेदीत नियत दरांपेक्षा जादा दराने स्थानिक पुरवठादाराकडून ही खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने ही तपासणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय काही विशिष्ट औषधांची गरज नसतानाही मोठी खरेदी झाल्याची माहिती सीबीआयकडे असून त्याचीही खातरजमा केली जाणार आहे.