CBI report on Disha Salian death case : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीबीआयने अहवालात नेमकं काय म्हटलं?

सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

नारायण राणेंनी दिशा मृत्यूप्रकरणात काय आरोप केले होते?

दरम्यान, नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे आरोप नारायण राणेंनी केले होते.

हेही वाचा : दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख

“आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते अशी लोक चर्चा करतात. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होता का? आता उत्तराखंड केसबद्दल बोलता. चुकीचं झालं असेल, तर कारवाई होईल, आम्ही लपवणार नाही. मात्र, दिशा सालियान, सुशांतसिंह राजपूतबाबत केलेलं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील,” असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

२०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं. नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला.

नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं.

हेही वाचा : नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, दिशा सालियानबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे आले अडचणीत!

बऱ्याच वादानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi report disclose reasons behind death of disha salian in mumbai pbs
First published on: 23-11-2022 at 11:10 IST