अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयनं तपास सुरू केला असून, कालपासून पथकाकडून काही जणांची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित पुरावेही सीबीआयनं ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, सुशांतनं आत्महत्या केलेल्या वांद्रेतील घरी पथक पोहोचलं असून, त्याचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतनं मानसिक नैराश्यातून आत्महत्या केली होती. मात्र, सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला असून, सीबीआयनं कालपासून (२२ ऑगस्ट) तपास सुरू केला आहे.
सीबीआयनं रविवारी कूपर रुग्णालयात जाऊन सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांची चौकशी केली. त्यानंतर सुशांतच्या वांद्रे येथील घरी सीबीआयचं पथक दाखल झालं आहे. सुशांतनं याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Maharashtra: Central Bureau of Investigation (CBI) team at the residence of #SushantSinghRajput in Mumbai. pic.twitter.com/yNNNUUSgLG
— ANI (@ANI) August 22, 2020
सुशांत सिंह प्रकरणाला असं मिळालं होतं वळण?
१४ जून रोजी सुशांतनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर या घटनेवरून शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाला वळण मिळालं. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल करेपर्यंत हे प्रकरण बॉलिवूडमधील घराणेशाही आणि सुशांतवर दबाव आणल्याच्या चर्चेभोवती फिरत होतं. या प्रकरणी बिहार सरकारनं सीबीआय तपासाची शिफारस केली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.