सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी प्रमुख शहरांत सीसीटीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रशासनास दिले.
प्रमुख शहरांत बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या बठकीत घेतला. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, गृह (विशेष) विभागाचे सचिव विनीत अग्रवाल, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारिया आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी तेथील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. सध्या तेथे भाडय़ाने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून त्याच्या खर्चाचा आढावा घेऊन तेथे कायमस्वरूपी यंत्रणा बसविण्याचा विचार करा. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे काम त्वरित पूर्ण करा, असा आदेशही त्यांनी दिला. मुंबई आणि पुणे येथील सीसीटीव्ही प्रकल्पही लवकर मार्गी लावावेत असेही त्यांनी सांगितले.
  राज्यातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक साधन-सामग्रीने सुसज्ज असणे आवश्यक असून यासाठी सध्याच्या प्रयोगशाळा अद्ययावत कराव्यात, त्यामुळे तपास कार्य लवकर होण्यास मदत होऊन जनतेला वेळेत न्याय मिळू शकेल. पोलिसांच्या समस्यांमध्ये लक्ष घालून त्वरीत कार्यवाही करण्यात येईल, असेही  फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पोलीस विभागाला पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, पोलीस विभागाचे आधुनिकीकरण, रिक्त पदे, पोलिसांसाठी पंचवार्षकि योजना, नक्षलग्रस्त भागासाठी पोलीस ठाणे, सशक्त-दूरकेंद्र इमारतीचे बांधकाम, नक्षल भागात प्रभावी दळणवळण यंत्रणा, अर्थसंकल्पीय तरतूद आणि खर्च, पोलीस निवासस्थाने, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आदी विविध विषयांचा आढावा फडणवीस यांनी
घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv cameras in prominent cities
First published on: 08-11-2014 at 04:43 IST