मुंबई : बेस्ट बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचा मोबाइल चोरणाऱ्या एका सराईत चोराला टिळकनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून विविध कंपनीचे महागडे २० मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चेंबूर येथून घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसमध्ये नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. गर्दीचा फायदा घेऊन एक चोर प्रवाशांचे मोबाइल चोरत होता. याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती चोरलेले मोबाइल विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सापळा रचून जहीर शेखला (३६) ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचे २० महागडे मोबाइल सापडले. या मोबाइलची किंमत दोन लाख ९० हजार रुपये इतकी असून बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरल्याची कबुली जहीरने दिली.