मध्य रेल्वेवर गेले तीन दिवस होणाऱ्या बिघाडांची पुनरावृत्ती शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही झाली. शुक्रवारी कल्याण येथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तब्बल अर्धा तास चाललेल्या या बिघाडामुळे सर्वच मार्गावरील वाहतूक ३५ ते ४० मिनिटे उशिराने सुरू होती. या दरम्यान १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कल्याण स्थानकातील ओव्हरहेड वायरमध्ये वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १-ए, १ आणि दोन येथे गाडय़ा नेणे अशक्य झाले. परिणामी मध्य रेल्वेच्या चारही मार्गावरील गाडय़ा खोळंबल्या. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी अर्धा तास लागला. अखेर दुपारी दोनच्या सुमारास विद्युतप्रवाह सुरू झाला आणि वाहतूक सुरू झाली. या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच मार्गावरील गाडय़ा ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच यादरम्यान १० सेवा रद्द करण्यात आल्या. परिणामी स्थानकांवर गर्दी जमली होती. तसेच प्रवाशांना लोकलमध्ये पाय ठेवण्यासही जागा नव्हती.