मुंबई : भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (आयआरएसएमइ) १९८८ तुकडीचे अधिकारी आणि मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. झोपेतच त्यांचे निधन झाले. त्यांना जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाची सूत्रे स्वीकारण्यापू्र्वी विजय कुमार यांनी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये (सीएलडब्ल्यू) महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी सीएलडब्ल्यूला नव्या उंचीवर नेण्यासाठी कठोर मेहनत घेतली. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सीएलडब्ल्यूने ७०० जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्पूर्ण लोकॉमोटीव्हचे उत्पादन करून इतिहास रचला. सध्याच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७७७ लोकोमोटिव्हचे वाढीव आणि आव्हानात्मक लक्ष्य देण्यात आले होते, त्यापैकी पहिल्या ६ महिन्यांतच सीएलडब्ल्यूने ४१७ लोकोमोटिव्ह बनविले. त्यांच्या ३५ वर्षांहून प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी भारतीय रेल्वेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून उत्तर-पश्चिम रेल्वे, रेल्वे मंडळ, उत्तर रेल्वे आणि संशोधन, डिझाईन व मानक संस्था (आरडीएसओ) यामध्ये मोलाचे योगदान दिले होते.

रेल्वे मंडळामधील कार्यकाळात, त्यांनी स्पॅनिश डिझाइनच्या ॲल्युमिनियम डबे असलेल्या ‘टालगो ट्रेनच्या’ गती चाचण्यांचे नेतृत्व केले आणि गोल्डन क्वॉड्रिलॅटरसह सर्व सेमी हाय-स्पीड मार्गांचे ते नोडल अधिकारी होते. आरडीएसओच्या कार्यकाळात भारताच्या उत्तर भागासाठी सहा वर्षांहून अधिक काळ निरीक्षण व समन्वय विभागाचे ते संचालक होते. त्यांनी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनएचएसआरसीएल) कार्यकारी संचालक/रोलिंग स्टॉक आणि रोलिंग स्टॉक संचालक म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

विजय कुमार यांनी पंजाब इंजिनीअरिंग महाविद्यालय, चंदीगड येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले होते. त्यांनी सिंगापूर व मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम, क्रिस सीआरआयएस/नवी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, तसेच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथे धोरणात्मक व्यवस्थापनविषयक कार्यशाळा पूर्ण केल्या होत्या.