मध्य रेल्वेमध्ये प्रवाशांशी संबंधित विभागांमध्ये सध्या हजारो पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या कारभारावर होत आहे. या विभागांमध्ये मोटरमन, गार्ड, स्टेशन अधीक्षक, बुकिंग क्लार्क आणि तिकीट तपासनीस यांचा समावेश होतो. महत्त्वाच्या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यामुळे हे कर्मचारी टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
मध्य रेल्वेवर १८ सप्टेंबर रोजी मोटरमन आणि गार्ड्स यांनी अचानक काम बंद आंदोलन केले होते. हे आंदोलन ‘तयारी वेळे’ संदर्भात करण्यात आले असले, तरी त्याचे मूळ मोटरमन आणि गार्ड यांच्या रिक्त पदांमध्ये होते. सध्या कार्यरत असलेल्या ७५३ मोटरमन आणि ५४२ गार्ड्स यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील कर्मचाऱ्यांना रोज नियोजित वेळेपेक्षा तीन ते चार तास जादा काम करावे लागत आहे. मध्य रेल्वेवर सध्या मोटरमनच्या ११७ आणि गार्ड्च्या २७६ जागा रिक्त आहेत.
सध्या दरदिवशी मासिक किंवा त्रमासिक पासाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जास्तीत जास्त वेळ तिकिटाच्या रांगेत उभे राहण्यात जातो. याचे मुख्य कारण म्हणजे तिकीट बुकिंग क्लार्कची सुमारे एक हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. २००१-०२ या वर्षांत मध्य रेल्वेत २००० बुकिंग क्लार्क होते. मात्र सध्या ही संख्या केवळ १२०० एवढीच आहे. मध्य रेल्वे प्रशासनाला याबाबत विचारले असता, एटीव्हीएम मशिन्स, जेटीबीएससारखी सुविधा झाल्यामुळे प्रवाशांना तेवढा त्रास सोसावा लागत नाही, असे सांगितले जाते.
रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या स्टेशन अधीक्षकांचीही मध्य रेल्वेत वानवा आहे. मध्य रेल्वेवरील तुलनेने कमी महत्त्वाच्या स्थानकांवर स्टेशन अधीक्षक नियुक्त नसल्याचे किंवा फक्त दिवसपाळीपुरतेच स्टेशन अधीक्षक असल्याचे लक्षात येते. अशा ठिकाणी रेल्वे स्थानकांवरील मुख्य बुकिंग क्लार्कला स्टेशन अधीक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागते.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांच्या सेवेत सध्या साधारण एक हजार तिकीट तपासनीसांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याऐवजी रेल्वेने सध्या निवृत्त झालेल्या तिकीट तपासनीसांना पुन्हा पाचारण करून त्यांना कमी मोबदला देणे पसंत केले आहे. हा प्रकार भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारा आहे, अशी टीका ‘एनआरएमयू’ने केली आहे. सध्या मध्य रेल्वेमध्ये १४०० ते १५०० तपासनीस आहेत. मात्र ही संख्या २५००च्या आसपास असणे आवश्यक आहे. ही पदे भरण्यासाठी मध्य रेल्वेच्या विविध विभागांमधून कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवण्यात आले असून त्यांची परीक्षा घेतली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.