मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अधिक चांगली सुविधा प्रदान करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांत मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये १० सरकते जिने आणि नऊ उद्वाहक व इतर प्रवासीभिमुख सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विभागाने जानेवारी – ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल, रेल्वेचे विविध इंडिकेटर, एटीव्हीएम बसविले आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत, वांगणी, विक्रोळी; हार्बर मार्गावरील मानखुर्द, टिळक नगर या रेल्वे स्थानकांमध्ये प्रत्येक दोन सरकते जिने बसविण्यात आले आहेत. तर, गोवंडी येथे ३, खर्डी व शिवडी येथे प्रत्येकी २, शेलू व चुनाभट्टी येथे प्रत्येकी एक असे एकूण नऊ उद््वाहक बसविण्यात आले आहेत.

गोवंडी येथे ६ मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १४ / १५, १६ / १७ आणि १८ ला जोडणाऱ्या जुना पादचारी पुलाच्याजागी डेक तयार करण्यात आला आहे. मशीद बंदर स्थानकावरील पादचारी पुलाच्या जुन्या जिन्याची पुनर्बांधणी करण्यात आली.

दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा

दिव्यांग प्रवाशांसाठी विशेषतः दृष्टीहीन प्रवाशांना निश्चित जागा शोधण्यास सोपे व्हावे यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावरील विविध स्थानकांवर एकूण १७० नवीन अलार्म बसवण्यात आले आहेत.

रांगेत उभे न राहता तिकीट

प्रवाशांना रांगेत उभे न राहता त्वरित तिकीट काढता यावे यासाठी मुंबई विभागातील ७५ स्थानकांवर २२८ नवीन ऑटोमॅटिक तिकीट मशीन (एटीव्हीएम) बसवण्यात आले आहे.

– सॅंडहर्स्ट रोड स्थानकावर चार नवीन जीपीएस घड्याळे बसवण्यात आली आहेत.

– घणसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकांवरील जुन्या इंडिकेटरच्या जागी नवीन स्पष्ट दिसणारे इंडिकेटर बसवण्यात आले आहे.

– बेलापूर आणि वाशी स्थानकावरील १६ फलाट इंडिकेटर बदलून त्याजागी नवीन इंडिकेटर बसविण्यात आले आहे. वाशी येथील सब वेमधील आठ इंडिकेटर बदलून नवीन इंडिकेटर बसविण्यात आले आहेत.

– खारकोपर आणि बामणडोंगरी स्थानकांवर फलाट, आरक्षण कार्यालय आणि सब वेमध्ये एकूण ४० नवीन इंडिकेटर बसवले आहेत.

– खांदेश्वर स्थानकावर फलाट आणि आरक्षण कार्यालयावर नवीन ८ रेल्वे इंडिकेटर बसवले आहेत.

– डोंबिवली स्थानकावर एक अतिरिक्त फलाट इंडिकेटर बसविला आहे.

– अपर कोपर स्थानकावर डेमु व मेमूसाठी दोन फलाट इंडिकेटर बसवले आहेत.

– सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १५/१६ वर दोन आणि उल्हासनगर, नेरळ आणि वांगणी स्थानकांवर नवीन ऑल-इन-वन व्हिडिओ डिस्प्ले इंडिकेटर बसवला आहे.

– विद्याविहार, टिटवाळा, उल्हासनगर येथील जुनी उद्घोषणा प्रणाली बदलून, नवीन प्रणाली बसवली आहे.