नव्या ‘उपग्रह टर्मिनस’चा आराखडा तयार; १२५० कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या सॅटेलाइट टर्मिनसबाबत (उपग्रह टर्मिनस) मध्य रेल्वेने प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. पनवेल येथे एक टर्मिनस तयार होत असताना आता मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथील प्रस्तावित टर्मिनससाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. १२५० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला असून आता हा आराखडा सल्लागारांकडे पाठवण्यात येणार आहे.
सध्या मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सीएसटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाची उत्सुकता प्रवाशांना आहे. मात्र या प्रकल्पात अनेक अडचणी येत असताना ठाकुर्ली येथील हे टर्मिनस त्यावरील उपाय असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणाऱ्या गाडय़ांमुळे उपनगरीय मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढवणे कठीण झाले आहे. मात्र ठाकुर्ली टर्मिनसचा पर्याय उपलब्ध झाल्यास या गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा त्या टर्मिनसकडे वळवता येतील आणि कल्याणपुढील मार्ग उपनगरीय गाडय़ांसाठी राखीव ठेवता येईल.
या प्रस्तावित टर्मिनससाठी डोंबिवली-ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांकडील पश्चिमेची बाजू राखून ठेवण्यात आली आहे. येथे उभारण्यात येणारे टर्मिनस उन्नत असून त्यात पाच प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. या प्लॅटफॉर्मखाली पार्किंगची सोय असेल. तसेच गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नऊ पीट लाइन्स असतील. हे टर्मिनस तयार झाल्यानंतर २५ अप आणि तेवढय़ाच डाऊन अशा ५० मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक वाढेल. या टर्मिनसपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या रस्त्यावाटे कोणताही मार्ग नाही. मात्र त्यावरही उपाय केला जाणार आहे.
सध्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित टर्मिनसचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार हे टर्मिनस उभे राहण्यासाठी १२५२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा आराखडा आता सल्लागारांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर हा आराखडा रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway proposes terminus at defunct thakurli
First published on: 23-03-2016 at 04:18 IST