करोना काळात मेल/एक्स्प्रेस गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवर अतिरिक्त गर्दी टाळावी यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. थोडक्यात प्रवास करणाऱ्या संबंधित प्रवाशाला सोडण्यास कमी लोकांनी यावे यासाठी दर वाढवण्यात आले होते. जे आता पूर्ववत करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने बुधवारी सांगितले की ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपयांवरून १० रुपये करत आहे आणि मुंबई तसेच ठाणे, पनवेल आणि कल्याण स्टेशन्स या ठिकाणांचा देखील समावेश आहे .

“करोना साथीच्या आजारामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांकडून सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत २५ नोव्हेंबरपासून ५० रुपयांवरून १० रुपये करण्याचे ठरवण्यात आले आहे.” मध्य रेल्वेने अशी अधिसूचना काढलेली आहे.

“वरील बाबी लक्षात घेता, बुकिंगशी संबंधित सर्व कर्मचार्‍यांना आणि पर्यवेक्षकांना सूचित केले जाते की त्यांनी बदल समजून घ्यावेत आणि त्यानुसार कार्य करावे,” असेही त्यात नमूद केले आहे.