रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये ‘मेगा हाल’ सहन करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सोमवारी सकाळीही त्रासातून सुटका झाली नाही. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भायखळा ते चिंचपोकळी या स्थानकांदरम्यान लोकलचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून वायर तुटली. या गाडीमागे असलेल्या दोन गाडय़ा तशाच अडकून पडल्या आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक ठप्प झाली. हा गोंधळ निस्तरायला सकाळचे साडेअकरा वाजले. तोपर्यंत दिरंगाईचे हे लोण मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही लागले आणि ऑफिस गाठायच्या घाईने निघालेल्या प्रवाशांचीही तार सटकली.
मुंबईहून ठाण्याला जाणारी लोकल सकाळी ८.२५च्या सुमारास भायखळ्यावरून पुढे रवाना झाली. या गाडीचा पेंटोग्राफ चिंचपोकळीच्या आधी ओव्हरहेड वायरमध्ये अडकला आणि वायर तुटली. या गाडीमागे कल्याण आणि ठाणे, अशा दोन गाडय़ा जागीच अडकून पडल्या. त्या गाडय़ांमागील गाडय़ा डाऊन जलद मार्गाने परळपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र तोपर्यंत या गाडय़ांना वेळापत्रकापेक्षा ३० ते ५० मिनिटे उशीर झाला होता.
या गाडय़ा आपल्या गंतव्यस्थानी जाऊन पुन्हा मुंबईकडे रवाना होण्यासाठी दिरंगाई होत होती. परिणामी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. या दरम्यान रेल्वेतर्फे उद्घोषणा करण्यात येत होत्या, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. मात्र विविध स्थानकांवर गाडय़ांसाठी ताटकळणाऱ्या प्रवाशांना कोणती गाडी नेमकी कधी येणार, याबद्दल काहीच सूचना उद्घोषणेद्वारे मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाल!
सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर होता. दुसऱ्या उपनगरात केंद्र मिळालेले अनेक विद्यार्थी लोकलने जाण्यासाठी स्थानकांत येत होते. मात्र स्थानकांमधील गर्दी पाहून आणि उशिराने येणाऱ्या लोकल पाहून या विद्यार्थ्यांनी लोकल गाडय़ांचा धसकाच घेतला. यापैकी अनेक जणांनी स्थानकाबाहेर पडत रिक्षा, टॅक्सी किंवा बस अशा वाहनांचाच आधार घेतला.