मुंबई : भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर ऑफ एक्सलेंस इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टी- कल्चरल स्टडीज’ची स्थापना केली जाणार आहे. भारतातील लुप्त होत चाललेल्या समृद्ध व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या संशोधन, संवर्धन आणि प्रचारासाठी या केंद्राचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रामुख्याने ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ या प्राचीन आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या भाषांवर भर दिला जाणार आहे. या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन हे या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.
दरम्यान, या प्रस्तावित केंद्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने विद्यापीठात ‘हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चर’ या विषयावर नुकतेच राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिसंवादासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार उपस्थित होते.
या परिसवादात उपस्थितांना संबोधित करताना डॉ. चंद्रशेखर कुमार म्हणाले की, भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भाषांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सदर केंद्राच्या माध्यमातून अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत चित्रफिती तयार करण्यात याव्यात. तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले की, ‘प्रस्तावित केंद्र हे ‘युगे युगेन भारत’, ‘ज्ञान भारतम्’ आणि ‘भारतीय भाषा संवर्धन योजना’ यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी समन्वय साधून कार्य करणार आहे.
हे केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत संशोधन, अभ्यासक्रम विकास, क्षेत्रीय सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून भारतीय भाषांचा जागर घडवणार आहे. या एकदिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन या केंद्राचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी सरगर यांनी केले. या परिसंवादात भारतातील परंपरागत भाषा, त्यांचे लोप होणे आणि त्या जपण्यासाठी स्थानिक समुदायांची भूमिका व डिजिटल माध्यमांचा वापर यावर सादरीकरण करून सखोल चर्चा करण्यात आली.