मुंबई : वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू असताना आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सीईटी कक्षाने राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नीट पीजी २०२५ च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुस्तिका व प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी कक्षाने संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे, नोंदणी शुल्क भरणे व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड बंधनकारक आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील व प्राथमिक गुणवत्ता यादी १० नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय व अभ्यासक्रमाचा पसंतीक्रम ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार आहे.
पहिली गुणवत्ता यादी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान सांयकाळी ५.३० पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://www.mahacet.org या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी अर्ज भरावा. नोंदणी अर्जामध्ये सादर केलेली माहिती राज्य कोट्यांतर्गत प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे.
