मुंबई : जेईईच्या धर्तीवर राज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वर्षातून दोनदा सीईटी घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार दोनदा सीईटी घेण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यानुसार २०२७ पासून राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या दोनदा सीईटी घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान पुढील वर्षी असलेल्या निवडणुका, जेईई परीक्षा आणि परीक्षा केंद्रांची कमतरता यामुळे मार्च ते मे २०२६ मध्ये परीक्षेबाबत चाचपणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमाच्या संस्थांच्या सीईटी लवकर होत असल्याने अनेक विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर अभियांत्रिकी घेण्यात येणाऱ्या जेईईप्रमाणे सीईटी दोन सत्रांत घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी कक्षाकडे याबाबत अहवाल मागवला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दरवर्षी जवळपास १४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सध्या चाचपणी सुरू आहे.

मात्र पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जेईई परीक्षा आणि सीईटी परीक्षेसाठी आवश्यक केंद्रांची कमतरता यामुळे पुढील वर्षी परीक्षा घेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता १५ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीमध्ये दोनदा सीईटी घेण्याच्या अनुषंगाने चाचपणी करण्यात येणार आहे. मात्र शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या प्रवेशासाठी वर्षातून दोनदा सीईटी घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करताना २०२६ च्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पहिली तर २०२७ च्या मार्च व एप्रिल महिन्यामध्ये दुसरी सीईटी घेण्यात येईल, असे सांगितले.

तीन अभ्यासक्रमांची होणार दोनदा सीईटी

सीईटी कक्षातर्फे राज्यभरात ७३ अभ्यासक्रमांसाठी १९ विविध सीईटी परीक्षा घेतल्या जातात. मात्र सुरुवातील या सर्व अभ्यासक्रमांची दोनदा सीईटी घेण्यात येणार नसून, फक्त अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र म्हणजे एमएचटी सीईटी आणि एमबी या अभ्यासक्रमाची सीईटी वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे.

पीसीएम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी ठरणार बीसीएसाठी पात्र

बीसीए, बीबीए या अभ्यासक्रमाला अधिकाधिक प्रवेश विद्यार्थ्यांना प्रवेश घेता याव्या यासाठी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये एमएचटी सीईटी अंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) या गटातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बीसीएसाठीही प्रवेश घेण्याची मुभा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.