मागील जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. आज अखेर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच शिंदे गटाच्या वकिलांवरही प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील या युक्तिवादानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल आणि कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे तर्क-वितर्क लावले जात आहेत. या तर्क-वितर्कांवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकाल काहीही आला तरी शिंदे फडणवीस सरकारला काहीही फरक पडणार नाही, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणारच आहे. त्या निकालाबाबत तर्क काढणे किंवा तर्कावर बोलणे हा माझा अधिकार नाही. ते माझं कार्यक्षेत्रही नाही. जो निर्णय येईल, तो निर्णय मान्य करून पुढे जायला पाहिजे.”
हेही वाचा- अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण, आरोपी महिलेला उल्हासनगरमधून अटक
मध्यावधी निवडणुका लागू शकतात का? असं विचारलं असता बावनकुळे पुढे म्हणाले, “दोन गोष्टी मी स्पष्टपणे सांगू शकतो. कुठल्याही मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. निवडणुका वेळेवर होतील. कुठलंही सरकार पडणार नाही. हे सरकार तर मुळात पडणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं हे सरकार २०२४ पर्यंत आपला कार्यकाल पूर्ण करेल. विरोधक केवळ आपले कार्यकर्ते आणि आमदार भाजपात जाऊ नयेत, म्हणून शिंदे-फडणवीस सरकार आता पडणार… उद्या पडणार… असं चित्र निर्माण करत आहेत. पण निकाल काहीही आला तरी सरकारला काही फरक पडणार नाही, असं मला वाटतं.”