लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची (नीट) प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) घेण्यात आला आहे. त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आले असून प्रश्नपत्रिका १८० प्रश्नांची असणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तासांचा कालावधी मिळणार आहे.

करोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले होते. मात्र आता परीक्षा जुन्याच पद्धतीनुसार घेण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे. करोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने नीट यूजीच्या परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नीट यूजीच्या परीक्षेमध्ये ‘अ’ व ‘ब’ असे दोन विभाग करण्यात आले होते. ‘अ’ विभागात ३५ अनिवार्य प्रश्न होते, तर ‘ब’ विभागामध्ये १५ पर्यायी प्रश्न होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याने एनटीएने परीक्षा मूळ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पद्धतीत प्रश्नपत्रिकेतून ‘ब’ विभाग काढून टाकण्यात येणार असल्याने पर्यायी प्रश्न नव्या प्रश्नपत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे नीट १८० अनिवार्य प्रश्नांची असेल. त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील प्रत्येकी ४५ प्रश्न आणि जीवशास्त्रातील ९० प्रश्न असतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना १८० मिनिटांचा म्हणजे तीन तासांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच करोनामध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही कमी करण्यात आला आहे. नीट यूजीच्या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना तयारी करण्याचा सल्ला एनटीएकडून देण्यात आला आहे.

प्रश्नपत्रिका नमुना:

  • प्रश्नपत्रिकेत 180 अनिवार्य प्रश्न असतील.
  • पर्यायी प्रश्नांची तरतूद वगळली
  • परीक्षेचा एकूण कालावधी १८० मिनिटे (३ तास)