मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर बुधवारी विविध कारणांमुळे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर सकाळी झालेल्या एका अपघातामुळे काही सेवा रद्द करण्यात आल्या. तर संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटल्याने गाडय़ा २५-३० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मध्य रेल्वेवर सकाळी १० च्या सुमारास कोपर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथे लोकलने एका प्रवाशाला धडक दिली. जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू ओढवला. मात्र या घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक रखडली.  त्यामुळे डोंबिवली ते ठाणे हे धीम्या मार्गाने  अंतर कापण्यासाठी ३५ मिनिटे लागत होती.
पश्चिम रेल्वेमार्गावर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चर्नीरोड आणि ग्रँटरोड या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. बोरीवली, विरार या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ा रखडल्या. या बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. परिणामी या मार्गावरील गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. संध्याकाळी उशिरा हा बिघाड दुरूस्त झाला.