मुंबई : ग्रॅण्ट रोडच्या पार्वती मेन्शनमधील तिहेरी हत्येप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी शनिवारी आरोपी चेतन गालाविरोधात ३६४ पानांचे आरोपपत्र दाखल केले. गंभीर गुन्हा असल्यामुळे तो सत्र न्यायालयात वर्ग होणार आहे.शेजाऱ्यांमुळे पत्नी आपल्याला सोडून गेल्याच्या रागातून चेतन गाला याने २४ मार्चला शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर चाकूहल्ला केला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. एका महिलेवर आरोपीने ३० ते ३२ वार केले होते.
आरोपीच्या हल्ल्यात शेजारी जयेंद्रभाई मिस्त्री (७७) आणि ईलाबाई मिस्त्री (७०) या दाम्पत्यासह १८ वर्षांच्या जेनील ब्रह्मभट हिचाही मृत्यू झाला होता.
याशिवाय या हल्ल्यात जेनीलची आई स्नेहल ब्रह्मभट (४४) व इमारतीत छोटी-मोठी कामे करणारा प्रकाश वाघमारे (५३) गंभीर जखमी झाले होते. २४ मार्चला घडलेल्या या घटनेचे चित्रीकरण काही पादचाऱ्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये केले होते. तेही या आरोपपत्रात पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे. याशिवाय इमारतीच्या शेजारी असलेले सीसीटीव्हीचे चित्रीकरणही या आरोपपत्रात सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपपत्रामध्ये ७२ साक्षीदारांची साक्ष असून दोन साक्षीदारांची साक्ष सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आली आहे. याशिवाय आर्थर रोड तुरुंगात चेतन गालाची ओळख परेड घेण्यात आली होती. त्यातही साक्षीदाराने आरोपीला ओळखले आहे.हत्येत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी पंचनाम्यानंतर जप्त केला होता. तपासात तो चाकू आरोपीने पायधुनी परिसरातून २४० रुपयांना खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाइल टॉवर लोकेशननुसार आरोपी चाकू खरेदी करताना पायधुनी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे.