छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र

भुजबळांच्या ट्रस्टला लाच देणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीविरोधात मात्र आरोपपत्रात उल्लेख नसल्याचे आढळून येते.

छगन भुजबळ

इंडिया बुल्स प्रकरणी सनदी लेखापालही आरोपी
सांताक्रूझ, कालिना येथील राज्य ग्रंथालयाची इमारत विकसित करण्यासाठी इंडिया बुल्स रिएल्टेक कंपनीला देऊन त्या बदल्यात अडीच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अधिकाऱ्यांसह एका सनदी लेखापालाविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भुजबळांच्या ट्रस्टला लाच देणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीविरोधात मात्र आरोपपत्रात उल्लेख नसल्याचे आढळून येते. सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्य़ात इंडिया बुल्स प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९ जून २०१५ रोजी तर महाराष्ट्र सदन प्रकरणात ११ जून रोजी गुन्हा दाखल केला. मात्र महाराष्ट्र सदन प्रकरणात एसीबीने पहिल्यांदा २० हजार ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. अद्याप हे आरोपपत्र सत्र न्यायालयाने दाखल करून घेतलेले नाही. तसेच या गुन्ह्य़ातील आरोपींना आरोपपत्राची प्रतही देण्यात आलेली नाही. आता इंडिया बुल्स प्रकरणात १७ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावेही सोबत जोडण्यात आल्याचा दावा एसीबीच्या तपास अधिकाऱ्याने केला आहे.
छगन भुजबळ यांना काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली सक्तवसुली महासंचालनालयाने १४ मार्च रोजी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या समवेत त्यांचे पुतणे समीर भुजबळ हेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. कालिना येथील मोक्याचा भूखंड इंडिया बुल्सला आंदण देणे आणि कंत्राटाच्या कालावधीत छगन भुजबळ वेल्फेअर ट्रस्टच्या नावे अडीच कोटींची देणगी घेणे म्हणजे लाच असल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे. याबाबतची दोन्ही वृत्ते ‘लोकसत्ता’ने अनुक्रमे ९ ऑक्टोबर व ९ डिसेंबर २०११ मध्ये प्रसिद्ध केली होती.

इतर पाच आरोपी
भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, कार्यकारी अभियंता हरीश पाटील, अधीक्षक अनिलकुमार गायकवाड, अवर सचिव संजय सोलंकी तसेच सचिव एम. एच. शहा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंडसंहितेच्या कलमांखाली आरोप ठेवले आहेत. याशिवाय सनदी लेखापाल रवींद्र सावंत यांचे नाव आरोपपत्रात नव्याने टाकले आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणातील सनदी लेखापालाचे नाव मात्र नमूद केले नव्हते, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chargesheet filed against chhagan bhujbal in mumbai university library scam case