मुंबई : पुणे येथून मुंबईत आलेल्या दोन व्यवसायिकांना पोलीस असल्याची बतावणी करून पाच – सहा जणांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पंचवीस लाख रुपये पळवल्याची घटना बुधवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यामध्ये जमिनीचा व्यवसाय करणारे संतोष खांबे आणि अमित कारंडे यांना १५ दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले होते. पंचवीस लाख रुपयांच्या बदल्यात आरोपी त्यांना ५० लाख रुपये देणार होते. खांबे आणि कारंडे २५ लाख रुपये घेऊन बुधवारी चेंबूर परिसरात आले होते. चेंबूरच्या ठक्कर बप्पा कॉलनी परिसरातील जोड रस्त्यावर या दोघांना बोलवण्यात आले. खांबे, कारंडे तेथे पोहोचताच आरोपीनी त्यांना पैसे दाखवण्यास सांगितले. खांबे यांनी पैशांची बॅग उघडली असता तेथे एक मोटारगाडी आली. या मोटारगाडीतून चार – पाचजण खाली उतरले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले आणि खांबे यांची पैशांची बॅग ताब्यात घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर कोणतीही चौकशी न करता त्यांनी पैशांची बॅग मोटारगाडीत ठेवली आणि ठाण्याच्या दिशेने पोबारा केला. खांबे, कारंडे यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र नजर चुकवून आरोपी पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तत्काळ नेहरूनगर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस मुख्य आरोपींचा शोध घेत आहेत.