Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईत सकाळी चार तासात चेंबूर परिसरात सर्वाधिक पाऊस पडला. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चेंबूर परिसरात १४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या परिसरातील अनेक बसमार्गही वळवावे लागले. सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. त्यातही पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पूर्व उपगरातील चेंबूर, मानखुर्द, चुनाभट्टी, कुर्ला, वडाळा हे भाग पाण्याखाली गेले होते.
हवामान खात्याने मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत होती. अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथके कार्यरत होती.
पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईत आज (दिनांक १८ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत (४ तास) सर्वाधिक पावसाची नोंद झालेली १० ठिकाणे (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)
- चेंबूर अग्निशमन केंद्र – १४०.८०
- पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर – १३९.६०
- बी. नाडकर्णी पार्क महानगरपालिका शाळा, वडाळा – १३३.२०
- वरळी सी फेस महानगरपालिका शाळा, वरळी – १३३.२०
- सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा, वरळी नाका – १३०.४०
- आदर्श नगर शाळा, वरळी – १२८.८०
- फ्रॉजबेरी जलाशय, परळ – ११८.८०
- सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, परळ – ११६.८०
- जिल्हाधिकारी वसाहत महानगरपालिका शाळा, चेंबूर – ११६.८०
- एफ दक्षिण विभाग कार्यालय, परळ- ११३
बसमार्ग वळवले…
अतिजोरदार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्याने बेस्ट परिवहन उपक्रमाच्या बसेसचे वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :
- शेल वसाहत, चेंबूर येथील वाहतूक चेंबूर नाका येथून परावर्तित
- गांधी मार्केट, शीव येथील वाहतूक भाऊ दाजी मार्ग येथून परावर्तित
- शिवसृष्टी /नेहरू नगर एसटी आगार, कुर्ला येथील वाहतूक एस. जी. बर्वे नगर मार्ग येथून परावर्तित
- संगम नगर, वडाळा येथील वाहतूक हनुमान मंदिर येथून परावर्तित
- सीजीएस वसाहत, अँटॉप हिल येथील वाहतूक शेख मिस्त्री दर्गा येथून परावर्तित
- आर. सी. एफ. रेल्वे पूल (चेंबूर) येथील वाहतूक आर. सी. मार्ग येथून परावर्तित
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, हिंदमाता येथील वाहतूक भोईवाडा येथून परावर्तित