मुंबई: महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी न्यायालयाकडून दिलेल्या परवानगीची मुदत वाढवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी) मुंबई कार्यालयात लागलेल्या आगीत त्यांच्या पारपत्राचे नुकसान झाले होते.

विशेष न्यायालयाने २९ एप्रिल रोजी भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली होती आणि ईडीकडे जमा केलेले पारपत्रही परत करण्यात आले होते. मात्र, १३ मे रोजी त्यांना पारपत्र मिळाले त्यावेळी ते भिजलेले व फाटलेले होते. २७ एप्रिल रोजी दक्षिण ‘कैसर-ए-हिंद’ इमारतीत भीषण आग लागली होती. या इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. ही आग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात आली होती.

या घटनेनंतर तत्काळ नवीन पारपत्रासाठी त्यांनी अर्ज केला. नवीन पारपत्र उशीरा मिळाल्यामुळे त्यांना २२ मे रोजी व्हिसा मिळाला. व्हिसा २८ मेपासून वैध आहे. त्यामुळे ते मूळ नियोजनानुसार २४ मे ते ८ जून या कालावधीत प्रवास करू शकले नाहीत. त्यांनी २८ मे रोजी प्रवास सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली. या अनपेक्षीत घटनेमुळे भुजबळ यांनी प्रवासाची मुदत १२ जूनपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी पक्षाकडून या अर्जाला विरोध करण्यता आला. यावेळी न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी व त्यात दिरंगाई करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विशेष पीएमएलए न्यायाधिशांनी दिलेल्या आदेशात प्रवासासाठी पूर्वीच परवानगी दिली आहे आणि पारपत्र ईडीच्या ताब्यात असताना नुकसान झाले. त्यामुळे प्रवासाला मुदतवाढ मंजूर देण्यात आल्याचे स्पष्ट केले.