Mumbai Airport Runway Closure: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर विमानतळावरील धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच विविध विमान कंपन्यांना याबाबत माहिती दिली आहे.

“विमान वेळापत्रक आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच विमान कंपन्यांना याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हवाई प्रवास सुरक्षितता आणि सुरक्षेचा सर्वोच्च दर्जा राखते”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी हवाई प्रवास सुरक्षितता आणि सुरक्षेचा सर्वोच्च दर्जा राखण्यासाठी वचनबद्ध आहे. पावसाळ्यानंतरच्या वार्षिक दुरुस्ती योजनेचा भाग म्हणून दोन्ही क्रॉस रनवे २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत तात्पुरते बंद राहतील.”

या दुरुस्तीमध्ये तपशीलवार तपासणी, धावपट्टीवरील लाईट्स, मार्किंग आणि ड्रेनेज सिस्टीमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असेल. मान्सूननंतरची देखभाल ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वर्षभर चालणाऱ्या ऑपरेशनल रेडिनेस प्रोग्रामचा अविभाज्य भाग आहे.