मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या शिफारशीला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सोमवारी न्यायमूर्ती आराधे यांच्या बढतीच्या शिफारशीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला होता.
न्यायमूर्ती आराधे यांना सर्वोच्च न्यायालयात बढती दिल्यानंतर उच्च न्यायालयात सध्या सेवा ज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस न्यायवृंदाने केंद्र सरकारला केली आहे. काही दिवसांपूर्वीच श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत न्यायमूर्ती आराधे यांच्यासह पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांच्या नावाचीही न्यायवृंदाने बढतीसाठी शिफारस केली होती. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस करण्यात आली होती.
न्यायमूर्ती आराधे मूळचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे, तर न्यायमूर्ती पांचोली हे गुजरात उच्च न्यायालयाचे आहेत. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया हे दोघे अलिकडेच निवृत्त झाले. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
आराधे यांची पार्श्वभूमी
आराधे यांनी १९८८ मध्ये वकिली सुरू केली. पुढे २९ डिसेंबर.२००९ रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त आणि १५ फेब्रुवारी.२०११ रोजी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी तेलंगणाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून आराधे यांची सुरूवातीला जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात २०१६ मध्ये बदली झाली. तेथे त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर, आराधे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाली. तेथेही त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात बदली होण्यापूर्वी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.