मुंबई : विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेचे मुख्य लोको निरीक्षक (चीफ लोको इन्स्पेक्टर) राकेश गौड (५७) यांनी गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. लोकलची धडक बसताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
अंधेरी लोहमार्ग पोलिसांकडे या घटनेची नोंद झाली आहे. गौड यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये आत्महत्या करत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे गौड यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देव्हरे यांनी सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी गौड यांची पत्नी, भाऊ यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना निद्रानाश असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आत्महत्येमागील ठोस कारण समजू शकलेले नाही. गौड यांच्यावर लोकलच्या मोटरमनचे समुपदेशन करण्याची जबाबदारी होती.