मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल याची खबरदारी सरकार घेईल; पण महामंडळानेही आपल्या कारभारात सुधारणा करावी, तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांना केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन विभागाचे सचिव, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी सरकार मदत करेल; पण महामंडळानेही आपल्या कारभारात सुधारणा करावी, सेवा वाढवाव्यात, तूट भरून काढण्यासाठी उपाय करावेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता बदलावी, अशा सूचना शिंदे-फडणवीस यांनी केल्या.कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जितक्या रकमेची तूट आहे ती रक्कम यापुढे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेलाच देण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेला होईल, असे आश्वासन सरकारने दिल्याची माहिती पडळकर यांनी दिली. तर एसटीच्या ताफ्यात नव्या बस घेण्यासंदर्भातही निर्णय झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.