मुंबई: राज्यात स्वेच्छेने केलेल्या धर्मांतरावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही पण दबाबतंत्र, जबरदस्ती, अथवा प्रलोभन देऊन धर्मांतर केल्यास त्या संस्थांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले. राज्यात होणाऱ्या धर्मांतर विषयी पोलिस महासंचालक यांचा अहवाल आलेला आहे. त्यानुसार कडक कारवाईची तरतूद केली जाईल असे त्यांनी सांगितले.
भारतीय संविधानानुसार देशात प्रत्येक नागरीकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. राज्यात सध्या ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ धर्मियांकडून धर्म स्वातंत्र्यांचा दुरुपयोग केला जात आहे. मूळ हिंदू धर्मांतर करुन ख्रिश्चन झालेले हे ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ अनुसुचित जाती, जमाती भटक्या विमुक्त जातीसाठी राखीव असलेल्या नोकऱ्या, शिक्षणातील फायदे घेत आहेत. या ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ धर्मियांची खरी ओळख त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी होते. या धर्मियांना जातीची प्रमाणपत्र देताना चौकशी केली जात नाही. धर्म ख्रिश्चन आणि फायदे हिंदू धर्मातील जातींचे ही संविधनाची फसवणूक आहे. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याची लक्षवेधी भाजपच्या अमित गोरखे यांनी मांडली. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. राज्यातील ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागात मोठया प्रमाणात धर्मांतर होत आहे. स्वेच्छेने धर्मांतराचा अधिकार संविधानाने दिला आहे मात्र संविधानानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग मान्य नाही. राज्यात दबाव, प्रलोभन, फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. पोलिस महासंचालकांचा धर्मांतर विषयी अहवाल आला आहे. त्यानुसार कायद्यात तरतूद केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत उमा खापरे, चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला. पुण्यातील दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अनाथ मुलीचे धर्मांतर केले जात असल्याचा गंभीर आरोप मागील आठवडयात लक्षवेधीद्वारे खापरे यांनी केला होता. राज्यात धर्मांतर विरोधी कयद्याची गरज असल्याची मागणी अनेक सदस्यांनी त्यावेळी केली. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा पुढील अधिवेशनात अधिवेशनात आणला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले होते. धर्मांतर कायदा आणणार का असा प्रश्न खापरे यांनी पुन्हा उपस्थित केला. धर्मांतर कायदा आणणार असे स्पष्ट आश्वासन न देता कायद्यात कडक कारवाईची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.