मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी गृहप्रवेश केला. फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती व मंत्र्यांचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी झाला होता. सुमारे पाच महिन्यांनी फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत.

फडणवीस हे ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी का जात नाहीत, याविषयी बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. तेव्हा मुलगी दिविजा हिची दहावीची परीक्षा झाल्यावर मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी जाणार असल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात दिले होते. बंगल्यावर दुरुस्तीच्या कामांसाठी वेळ लागल्याने फडणवीस यांनी एप्रिलअखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. यानिमित्ताने छोटी पूजाही करण्यात आली.

दिवाजाला दहावीत ९२.६० टक्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा हिचा दहावीच्या परीक्षेचा निकालही बुधवारी जाहीर झाला. त्यात तिला ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत. तिने फोर्ट येथील कॅथेड्रल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.