मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मागील काही वर्षांपासून झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरु असून ते डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी झोपु प्राधिकरणाला दिले. गुरुवारी झोपु प्राधिकरणाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. झोपु प्राधिकरणामार्फत मुंबईतील १३ लाख ७९ हजार ८६ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार आतापर्यंत ५ लाख ७० हजार २५३ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने झोपु योजनांना गती देण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने घेतला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे झोपु योजनेतील घरे लाटली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे झोपुच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक आणि अतिजलद करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार २०१६ पासून बायोमेट्रीक सर्वक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
तीन संस्थांच्या माध्यमातून या सर्वेक्षण करण्यात येत असून २०२१ मध्ये जुन्या संस्थांच्या जागी नवीन तीन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन संस्थांच्या माध्यमातून सध्या बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरु आहे. आतापर्यंत अर्थात २०१६ ते १० जून २०२५ पर्यंत १३ लाख ७९ हजार ८६ झोपडीधारकांपैकी ५ लाख ७० हजार २५३ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
झोपु प्राधिकरणाकडून २५९७ झोपडपट्टी गटातील एकूण १३ लाख ७९ हजार ८६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण आणि त्यानंतर या झोपड्यातील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १३ लाख ७९ हजार ८६ झोपड्यांपैकी १० लाख ७८ हजार ७४६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर ८ लाख १९ हजार २६१ झोपड्यांना क्रमांक देण्यात आला असून ५ लाख ७० हजार २५३ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
अजूनही मोठ्या संख्येने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण होणे शिल्लक आहे. त्यामुळे या कामाला वेग देत डिसेंबर अखेरपर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी झोपु प्राधिकरणाला दिले आहेत. तेव्हा आता झोपु प्राधिकरणाकडून मनुष्यबळ वाढवित, कामाचा वेग वाढवित निश्चित वेळेत, डिसेंबरअखेरपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.