मुंबई : यंदा पासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.
विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह; व्याख्याने, लोककलांच्या अविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या वर्षी थेट शासनाच्या सहभागातून गणेशोत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्ध भूमी आहे. संत-सुधारकांचा, थोरांचा-विरांचा, भक्तीचा-अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली दख्खनची ही पवित्र माती, वैचारिक प्रकल्गभतेने ओतप्रेत भरलेली असून; राज्याच्या आर्थिक/सामाजिक/ सांस्कृतिक प्रगतीचा पाया इथल्या सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी ‘ सार्वजनिक गणेशोत्सव ‘ मोलाची भूमिका बजावत आहे. शेकडो वर्षाची घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचा मानबिंदू आहे.
याच मानबिंदूचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड घातली जावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी राज्य शासनाचा प्रत्यक्ष सहभाग त्यात असावा, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा शेलार यांनी विधानसभेत केली होती.
भारतीय सैन्य दलाने फत्ते केलेले ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ आणि स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी ‘ स्वदेशीचा जागर’ हे दोन विषयही या निमित्ताने राज्यमहोत्सवाशी जोडण्यात येत आहेत. अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असणारा सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.