मुंबई : ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे दोन महिन्यांत पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

 ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि विविध विकासकामांसंदर्भात विधानभवनात झालेल्या बैठकीत शिंदे बोलत होते. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर महापालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड जिल्हाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.  ठाणे शहर आणि परिसरातील मुंब्रा बाह्यवळण, घोडबंदर रस्ता ते गायमुख, खारेगाव, साकेत पुलाची दुरुस्ती तसेच नाशिक, अहमदाबाद महामार्गावरील कामे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

ठाणे परिसरात विविध पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर शहरातील आणि महामार्गाना जोडणाऱ्या रस्त्यांची आणि पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत खबरदारी घ्या. आगामी पावसाळय़ापूर्वी दोन महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करावी. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस, महापालिका बांधकाम या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही कामे पूर्ण करावीत. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवजड वाहनांसाठी वाहनतळ..

जवाहरलाल नेहरू बंदरातून (जेएनपीटी) येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहनतळ करावेत. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढवावी, अवजड वाहन नादुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी महामार्गावर क्रेन्सची सुविधा वाढवावी, या कामाशी संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाचा एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ठाणे शहरातून जाणारे सेवा रस्ते महामार्गाशी जोडण्याचे आदेशही त्यांनी दिले.