मुंबई : विकास कामांमध्ये आमच्या सरकारने घेतलेल्या वेगामुळेच मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही जनतेच्या मनात आहोत. हे सारे श्रेय माझे एकटय़ाचे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ, सर्व मंत्रिमंडळ आणि जनेतेचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत जाहीरातीवरून अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. तर फडणवीस मागे पडले व शिंदे पुढे गेले, हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. दोघेही उत्तम कामगिरी करीत आहेत, असा दावा करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना शिंदे गटाबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजीच व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरील कोल्हापूरचा दौरा तब्येत बरी नसल्याने रद्द केला असला तरी त्यामागे फडणवीस यांची नाराजी कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीवरून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. मुख्यमंत्री शिंदे यांना जनतेने २६.१ टक्के तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांनी पसंती दिल्याचा सर्वेक्षणातील आकडेवारीचा उल्लेख करण्यात आल्याने भाजपमध्ये तीव प्रतिक्रिया उमटली. ‘देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक पसंती देणाऱ्या सर्वेक्षण कंपनीचा क्रमांक कुठे मिळेल, असे ट्वीट भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केल्याने भाजपमधील अस्वस्थता समोर आली.

दोघेही जनतेच्या मनात : मुख्यमंत्री शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचे हे डबल इंजिन सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झपाटय़ाने काम करीत आहे.आम्ही घरात बसून काम करीत नाही, ते थेट लोकांमध्ये जातो. रस्त्यावर उतरून काम करतो. गेल्या वर्षभरात रखडलेले प्रकल्प सुरू केले. विकास कामांची गती वाढविली म्हणूनच राज्यातील जनतेने आशिर्वाद, प्रेम दिले .लोकांनी आमचे मनापासून अभिनंदन केले आहे. फोटो असेल नसेल, त्यापेक्षा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लोकांच्या मनात आहोत, हे महत्वाचे आहे, असा उल्लेख शिंदे यांनी केला. सर्वेक्षणात लोकांनी आपल्याला अधिक पसंती दिल्यामुळे जबाबदारी वाढली आह, याकडे शिंदे यांनी जाणिवपूर्वक लक्ष वेधले. आता आम्ही आणखी जोमाने काम करु. आमचा कामाचा वेग वाढेल. आम्ही पाठविलेल्या प्रस्तावांना मोदी-शहा यांच्याकडून लगेच मान्यता मिळते आणि राज्याला भरघोस निधी मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

निष्कर्ष काढणे चुकीचे : बावनकुळे

राज्यात सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीसांनी यंदा सादर केलेला अर्थसंकल्प लोकप्रिय होता. त्यामुळे या सरकारची कामगिरी सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे पुढे वा फडणवीस मागे हा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याची प्रतिकि्िरया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात नरेंद्र ही घोषणा मागे पडली का? असा सवाल बावनकुळे यांना केला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाची ही जाहिरात असावी. २०१४ मध्ये आम्हाला १२२ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये भाजपा सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता युतीचे सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. दोघंही उत्तम काम करत आहेत. राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. त्यांच्या कर्तुत्वाबद्दल शंका घेऊ नये. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगलं काम केलं होतं. मुळात कोण मोठं, कोण लहान हे शिवसेना-भाजपमध्ये महत्त्वाचे नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमध्ये शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु कान दुखत असल्याने विमानाने दोन दिवस प्रवास करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने फडणवीस यांनी दौरा रद्द केल्याने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपला हे मान्य आहे का ? – अजित पवार यांचा सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी असल्याची सर्वेक्षणातील आकडेवारी भाजपला मान्य आहे का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शिवसेना आमचीच, असा दावा करणाऱ्यांनी जाहीरातीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरले पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरले, अशी टीकाही पवार यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे व भाजप-शिवसेना युतीला जनतेचा एवढा भरभरून पाठिंबा आहे मग महानगरपालिका, नगरपालिका वा जिल्हा परिषदांच्या निवडणुका का लांबणीवर टाकल्या जात आहेत, असा सवालही पवार यांनी केला.