मुंबई : बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेबरोबर रोजगारनिर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, अशा शहरांच्या निर्मितीची गरज असून या निर्मितीत सिडकोची भूमिका महत्त्वाची आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारच्या सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे सिडकोच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अप्पर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्यात येणार आहे. विमानतळावर पार्किंगची चांगली सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. त्याचबरोबर विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर पाहिजे, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या. विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक ‘कनेक्टिव्हिटी’ची कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सूचना सिडको अधिकाऱ्यांना केली.

नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी तसेच या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्यांची रुंदी भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन निश्चित करण्यात यावी. भविष्यात सुरू होणाऱ्या आणि सद्या:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा कालावधी नक्की करण्यात यावा. यापुढे पायाभूत सोयी-सुविधा निर्मितीच्या कामांबाबत निविदेमध्येच कालावधीची सक्ती करण्यात यावी, कामांचा कालावधी हा निश्चित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो स्थानकापासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी. घरकुल व गृहनिर्माणाच्या बाबतीत कामे दर्जेदार करण्यात यावीत. याबाबतही कालावधीची मर्यादा ठेवावी. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत कार्यवाही करावी. नवी मुंबई परिसरात क्रीडा सुविधांची कामे सुरू आहेत. या भागामध्ये क्रीडा सुविधांचा चांगला विकास होत आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सिडकोच्या भविष्यातील प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.