मुंबई : मराठा आंदोलनामध्ये सर्वात लक्षवेधी ठरली ती भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक बाहुली. चित्रा वाघ यांनी मराठा आंदोलन आणि नेते जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेमुळे मराठा आंदोलक चांगलेच संतापले आहेत. आंदोलनात आलेल्या काही हौशी कार्यकर्त्यांनी एक बाहुली तयार केली असून ती चित्रा वाघ यांची बाहुली असल्याचे सांगत ती बाहुली आंदोलनात फिरवत राग व्यक्त करत आहेत.
सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आंदोलनक हलगी तसेच ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आहेत. आंंदोलनात जोश आणण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण घोषणा दिल्या जात आहेत. त्यात चर्चेत आली आहे ती एक बाहुली.. ही बाहुली कार्यकर्ते हातात घेऊन संपूर्ण परिसरात फिरत आहेत.
बाहुली चित्रा वाघ यांची असल्याचा दावा
या बाहुलीला लाल रंगाचे कपडे घालण्यात आले आहे. ही बाहुली साधारण अडीच ते तीन फूट उंच लांबी आहे. ही बाहुली भाजप महिला मोर्च्याच्या नेत्या आमदार चित्रा वाघ चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ही बाहुली नाचवून कार्यकर्ते चित्रा वाघ यांच्याबद्दल असलेला राग व्यक्त करत आहेत.
नेमका वाद काय?
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावरून वाद सुरू झाला. त्यातच आमदार चित्रा वाघ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या एका व्हिडिओचा हवाला देत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर चित्रा वाघ यांनी जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, “केवळ राजकीय मतभेदामुळे कोणाच्याही आई-वडिलांवर टीका करणे योग्य नाही आणि असा अपमान सहन केला जाणार नाही. या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे-पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या आईला शिवी दिली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, जर त्यांच्या बोलण्यातून असे काही शब्द गेले असतील तर ते शब्द मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चित्रा वाघ यांना उलट प्रश्न विचारत असेही म्हटले की, “आमच्या आया-बहिणींवर लाठीमार झाला तेव्हा तुम्ही कुठे होता?” चित्रा वाघ यांनी थेट जरांंगे पाटील यांना आव्हान दिल्याने मराठा आंदोलक त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.