काही ना काही कारणांनी रखडलेल्या चर्चगेट ते विरार या प्रस्तावित उन्नत रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला (ट्रॅफिक स्टडी) सुरुवात झाली असून त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर विचार करून या प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी शुक्रवारी मंबईत दिली. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेत सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दोन्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया, अरुणेंद्र कुमार आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली.
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अरुणेंद्र कुमार यांनी या उन्नत रेल्वे मार्गाबाबत बोलताना सांगितले की, ‘राईट्स’ या संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. दरम्यान, अरुणेंद्र कुमार हे शनिवारी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेला भेट देणार आहेत.