मुंबई : पवई येथील पंचवटी कॉम्प्लेक्समधील शिवभगतानी मनोर इमारतीजवळ सोमवारी दुपारी २.४१ च्या सुमारास लगतच्या टेकडीवरून दोन दगड कोसळले. इमारतीशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर ते दगड पडले. त्यात तीन मोटारींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई शहर व उपनगरात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दरम्यान, शहर व उपनगरात झाड, फांद्या पडणे व घर, भिंत पडल्याच्या एकूण ९ घटना घडल्या. शहरात १, पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरत ३ अशा एकूण ७ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच, शहरात व पश्चिम उपनगरात एका ठिकाणी घराचा भाग पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

तसेच, २ ठिकणी शॉर्टसर्किट झाले होते. मात्र, प्रशासनाने घटनास्थळी तातडीने मदत पोहोचवल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, एल विभागातील पवई येथे असलेल्या टेकडीवरून सोमवारी दुपारी अचानक दोन धोकादायक दगड पंचसृष्टी कॉम्प्लेक्स जवळ उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले. संबंधित जागा म्हाडा प्राधिकरणाच्या आखत्यारित आहे. दुर्घटनेचे वृत्त समजताच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, धोकादायक दगड व मातीचा ढिगारा उचलण्यात आला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.