लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी गुरुवारी सायंकाळी भिडले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली व कपडे फाडण्यात आले. विधान भवनात कार्यकर्त्यांची हाणामारी होण्याचा हा दुर्मीळच प्रसंग असल्याने गोंधळ उडाला.

या घटनेचे सीसीटीव्ही छायाचित्रण तपासण्याच्या सूचना दिल्या असून त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. ही घटना अतिशय चुकीची आहे. विधान भवनाचा परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारित येत असून त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पडळकर आणि आव्हाड यांच्यात बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारात जोरदार भांडण झाले होते. आव्हाड विधानसभेत असताना बाहेर त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख काही कार्यकर्त्यांबरोबर उभे होते. तेव्हा पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ‘ हा काल भांडणाच्या वेळी तिथे होता, त्याला धरा, ’ असे सांगून हाणामारी सुरू केली

आणि आव्हाड यांचे कार्यकर्तेही त्यांना भिडले. विधान भवनाच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ओढून बाजूला केले आणि हाणामारी करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना स्वतंत्र खोल्यांमध्ये नेले. हा प्रकार पडळकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आव्हाड समर्थकांचा दावा आहे. मलाच मारण्यासाठी पडळकर यांचे कार्यकर्ते आले होते, असा आरोप करीत आमदारच सुरक्षित राहात नसतील, तर राहायचे कशाला, असा सवाल आव्हाड यांनी केला. तर पडळकर यांनी या घटनेबद्दल केवळ दिलगिरी व्यक्त करीत अधिक बोलणे टाळले.

पडळकर हे बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारात गाडीतून उतरत असताना दरवाजा बंद करीत असताना तो आव्हाड यांना लागला, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि शिवीगाळही झाली. आव्हाड यांनी पडळकर यांचा ‘ मंगळसूत्र चोर ’ असा उल्लेख केल्याने पडळकर संतप्त झाले होते. ही शिवीगाळ वाढली आणि एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी विधान भवनात काहीतरी होणार, असा दोघांचाही अंदाज असल्याने त्यांच्याबरोबर काही कार्यकर्तेही आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला – आव्हाड

पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून या घटनेचे सीसीटीव्ही व मोबाइलवर छायाचित्रण उपलब्ध आहे. अनेक लोकांसमोर ही घटना घडल्याने आम्हाला अधिक पुरावे देण्याची गरज नाही. विधानसभेत गुंडांना प्रवेश मिळणार असेल आणि ते अशा प्रकारे हल्ले करणार असतील, तर नागरिकही सुरक्षित राहू शकणार नाहीत. पडळकर हे शिव्या देतात. ही कोणती भाषा आणि सत्तेची धुंदी आहे, असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. मारहाण करणारे समर्थक आहेत की गुंड? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी विधान भवनाचे प्रवेशपत्र दिले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.