मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध अमराठी आणि हिंदी भाषा या मुद्द्यांवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाल्याचं दिसत आहे. आज मिरारोड येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी भाषेला कशाप्रकारे डावलले जात आहे हे सांगत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.

“एखाद्या भाषेला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर ती भाषा १४०० वर्षे जुनी असायला हवी. हिंदीला हा दर्जा मिळायला आणखी १२०० वर्षे लागतील”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. हिंदीमुळे कुणाचं भलं झालं आहे आतापर्यंत, असा खोचक सवालही करत ते म्हणाले, “हिंदीमुळे केवळ नट-नट्यांचं भलं झालं, याव्यतिरिक्त कोणाचं भलं झालं? उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार इथे हिंदी बोलली जाते. मग ते लोक कामधंद्यासाठी इथे का येतात? हिंदी बोलून जर तुम्हाला तिथे नोकरी मिळत नसेल तर मग काय उपयोग? गुजरातसारख्या राज्यात जाऊन तुम्हाला जर मार खावा लागत असेल तर हिंदीने काय भलं केलं तुमचं? आणि त्याच भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठीची मागणी केली होती. त्यानंतर दर्जा मिळालादेखील. आता वर्ष होईल मात्र एक रूपयासुद्धा मिळालेला नाही. हिंदी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी किमान १२०० वर्षे आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्यावर आणि आमच्या लहान मुलांवर लादणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. “हिंदी ही इकडच्या तिकडच्या कडबोळ्यातून तयार झालेली २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. या एका भाषेमुळे जवळपास अडीचशे भाषा मारल्या गेल्या, असेही राज ठाकरे म्हणाले बिहारमध्ये ९९ टक्के लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाही. हनुमान चालीसा ही हिंदी भाषेत आहे असं म्हणता ती हिंदी नाही अवधी भाषा आहे. भाषेवर यांचं मुळात प्रेमच नाही. महाराष्ट्रातले जेवढे नेते आहेत, त्या सर्वांमध्ये माझं हिंदी उत्तम आहे” , असेही राज ठाकरे म्हणाले. “हिंदी ही काही वाईट भाषा नाही, पण ती जर आमच्यावर लादणार असाल तर नाहीच बोलणार”, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.