मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीमधील (आधीचे अर्थशास्त्र विभाग) डॉ. एस. ए. दवे सेंटर फॉर रिसर्च अँड टीचिंग इन फायनान्सच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना हवामान बदल, हवामान वित्त (क्लायमेट फायनान्स) आणि शाश्वत विकासाचे धडे देण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी नुकताच लखनऊमधील बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट (बीआयआरडी) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराच्या अनुषंगाने बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट संस्थेमार्फत हवामान वित्तच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांना लखनऊ येथील ‘एक्सपेरिअन्शियल क्लायमेट चेंज लॅब’मध्ये शिकण्याचा लाभ मिळेल. तसेच या विद्यार्थ्यांना लखनऊमधील बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून धोरणात्मक संवाद घडवून आणण्यासाठी सदर क्षेत्रातील प्रगत अभ्यास, संशोधन, परिसंवाद आणि परिषदांच्या स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात ज्ञान व अनुभव मिळण्यासाठी दोन्ही संस्थांनी स्तूत्य उपक्रम हाती घेतला आहे. यातून विद्यार्थी जागतिक हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होतील तसेच देशाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देऊ शकतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य अजय भामरे, बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक आणि विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. निरुपम मेहरोत्रा, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विभागाच्या संचालिका प्रा. मनिषा करने, दवे सेंटरच्या समन्वयक डॉ. माला लालवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.